देशमुख अपहरण आणि हत्येची घुलेकडून कबुली
जयराम घाटे आणि महेश केदार यांनीही दिली हत्येची कबुली
बीड: प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या केल्याची कबुली या प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी आणि सरकारी वकील उज्वल निकम यांनी टोळीचा प्रमुख म्हणून वर्णन केलेल्या सुदर्शन घुले याने दिली आहे. त्याच्याबरोबरच जयराम घाटे आणि महेश केदार या आरोपींनी देखील अपहरण आणि हत्तीची कबुली दिली आहे. या कबुलीजबाबामुळे संतोष देशमुख यांची हत्या हा मोठ्या कटाचा भाग आहे, हे स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.
संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्याच्या प्रकरणी संतोष देशमुख आणि आरोपी यांच्यामध्ये वितुष्ट आले होते. या प्रकरणातूनच देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी आठ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून कृष्णा आंधळे हा एक आरोपी फरार आहे.
या खटल्याची पहिली सुनावणी काल केज न्यायालयात पार पडली. या वेळी सरकारी वकील उज्वल निकम यांनी आरोप ठेवण्याची तयारी दर्शवली. मात्र, आरोपपत्रांसह अन्य आवश्यक कागदपत्रे न मिळाल्यामुळे आरोप निश्चित न करण्याची विनंती आरोपींच्या वकिलांनी केली. या गुन्ह्यात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याच्या मार्गदर्शनाखाली आणि सुदर्शन घुले याच्या नेतृत्वाखाली टोळीने काम केल्याचा दावा सरकारी वकील निकम यांनी न्यायालयात केला.