दिशा सालियान मृत्यू प्रकरणाला वेगळेच वळण
मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये खळबळजनक उल्लेख
मुंबई: प्रतिनिधी
दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची व्यवस्थापिका दिशा सालियान तिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमुळे वेगळेच वळण मिळाले आहे. या अहवालात अनेक खळबळजनक उल्लेख करण्यात आले असून त्यामुळे तिच्या मृत्यूच्या फेरतपासाची मागणी करणारे तिचे वडील सतीश सालियान यांच्याकडे संशयाची सुई रोखली जात आहे.
दिशाने आत्महत्या केली नसून सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाचा फेरतपास केला जावा, या मागणीसाठी सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचप्रमाणे मुंबई पोलीस आयुक्तांकडे अर्ज देखील केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे, त्यांचा अंगरक्षक, अभिनेता दिनो मारियो, सूरज पंचोली यांना आरोपी करण्याची मागणी सतीश सालियान यांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. मात्र, मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमुळे दिशाने कौटुंबिक कारणाने आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे.
दिशा ही आर्थिक विवंचनेत होती. तिचे वडील सतीश यांचे एका महिलेशी विवाहबाह्य संबंध होते. तिला देण्यासाठी सतीश हे दिशाकडे वारंवार पैशाची मागणी करत होते. त्यामुळे दिशा वैतागली होती. ही बाब तिने आपल्या जवळच्या मित्रांना सांगितली होती, असे पोलीस अहवालात नमूद करण्यात आले आहे.