भारतीय सैन्याने बनवला दुश्मनांचा कर्दनकाळ
संपूर्ण भारतीय बनावटीच्या अत्याधुनिक एफपीव्ही ड्रोनची चाचणी यशस्वी
नवी दिल्ली: प्रतिनिधी
भारतीय सैन्याच्या फ्लेर डे लीस ब्रिगेडने दहशतवादी आणि शत्रुराष्ट्रांच्या सैन्याचा कर्दनकाळ ठरणारा अत्याधुनिक फर्स्ट पर्सन व्ह्यू ड्रोन विकसित केला असून त्याची चाचणी यशस्वी ठरली आहे. आत्मघातकी हल्ल्यासारखी कामगिरी करणारा संपूर्ण भारतीय बनावटीचा हा ड्रोन अमेरिका आणि इस्राएलसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या देशांच्या ड्रोनपेक्षा किफायतशीर आणि अधिक प्रभावी असणार आहे.
रणगाडा भेदू शकणाऱ्या शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या या ड्रोनचा वापर दुर्गम ठिकाणी लपलेल्या दहशतवाद्यांच्या विरोधात तसेच समोरून आक्रमण करणाऱ्या शत्रुसैन्याला रोखण्यात प्रभावी ठरू शकतो. हा ड्रोन स्थिर आणि गतिमान अशा दोन्ही लक्ष्यांचा भेद करू शकतो.
सर्वसाधारणपणे एफपीव्ही ड्रोन रेडिओ लहरींच्या तंत्रज्ञानावर आधारित असतात. त्यामुळे त्यांना जॅम करणे शक्य होऊ शकते. मात्र भारतीय सैन्याने विकसित केलेला हा नवीन ड्रोन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नेव्हिगेशन तंत्रज्ञानावर तसेच फायबर ऑप्टिकच्या नियंत्रण साधनांवर चालत असल्याने त्याला जॅम करणे शक्य होणार नाही.
शत्रू सैनिकांच्या समूहा विरोधात, रणगाडे आणि चिलखती वाहनांच्या विरोधात त्याचप्रमाणे वेगवान आणि जोरदार स्फोट घडवण्यासाठी या दोन चा वापर करण्यात येऊ शकतो. या ड्रोनची निर्मिती भारतातच होणार असल्याने ती किफायतशीर ठरणार आहे. त्याचप्रमाणे त्याच्या निर्मितीसाठी सप्लाय चेन सहजपणे उपलब्ध होऊ शकणार आहे.
अधिक वजनाची शस्त्रास्त्रे वाहून नेणे, दूरपर्यंत लक्ष्याचा पाठलाग करणे आणि अचूकपणे लक्ष्याचा वेध घेणे सहजपणे शक्य होईल अशा तऱ्हेने या ड्रोनची रचना करण्यात आली आहे. या ड्रोनचे विकसन ही भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी एक मोठी उपलब्धी ठरणार आहे.