राज्यभरात पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर
वक्फ सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर सज्जता
मुंबई: प्रतिनिधी
आज दुपारी केंद्र सरकारच्या वतीने वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मांडले जाणार असून त्यावर तब्बल आठ तास चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विशेषतः मुस्लिम बहुल भागामध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. राज्यभरात पोलीस अलर्ट मोडवर सज्ज आहेत. संवेदनशील ठिकाणी ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचे पाऊल पोलिसांनी उचलले आहे.
वक्फ सुधारणा विधेयकाला काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचा कसून विरोध आहे. मात्र, मित्र पक्षांच्या मदतीने सरकार हे विधेयक लोकसभेत मंजूर करून घेऊ शकते. मात्र, या विधेयकाचा विषय अल्पसंख्या मुस्लिम समाजाशी संबंधित असल्यामुळे काही ठिकाणी त्यावर प्रतिक्रिया उमटून कायदा सुव्यवस्था धोक्यात आणली जाऊ शकते. त्यामुळे काल रात्रीपासूनच राज्यात पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत.
वक्फ सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यात देखील अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू हे लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मांडणार आहेत. या विधेयकावर बोलण्यासाठी सत्ताधाऱ्यांना चार तास 40 मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. यापैकी चार तासाच्या वेळेत सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचे खासदार बोलणार आहेत तर मित्र पक्षांना या विधेयकावर बोलण्यासाठी 40 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. या विधेयकावर एकूण आठ तास चर्चा केली जाणार असून आवश्यकता वाटल्यास लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला चर्चेचा वेळ वाढवून देऊ शकतात.