दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानने केले हात वर
भारताचे केंद्र सरकार जबाबदार असल्याचा पाकिस्तानचा आरोप
नवी दिल्ली: प्रतिनिधी
पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानने हात वर केले आहेत. या हल्ल्याशी आमचा कोणताही संबंध नाही, असा दावा करतानाच भारताचे केंद्र सरकारच या हल्ल्यांना जबाबदार असल्याचा आरोप पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला. भारतात आसाम, मणिपूर, नागालँड, छत्तीसगड अशा अनेक राज्यात केंद्र सरकार बद्दल तीव्र नाराजी आहे. ही नाराजीच अशा दहशतवादी हल्ल्यांना कारणीभूत ठरत आहे. मात्र, भारतीय केंद्र सरकार पाकिस्तानकडे बोटे दाखवीत आहे, असा आरोप आसिफ यांनी केला.
पहेलगाममधील मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाणारे बैसरन येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला असून वीसहून अधिक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी लष्करे तय्यबा या दहशतवादी संघटनेचा एक भाग असलेल्या दि रेजिस्टंट फ्रंट या संघटनेने स्वीकारली आहे. या हल्ल्याचा कट आणि सूत्रसंचालन रावळपिंडी येथून झाल्याचा भारतीय गुप्तचर यंत्रणांचा दावा आहे. सैफुल्ला कसुरी उर्फ खालिद हा लष्करे तय्यबाचा कमांडर या हल्ल्याचा सूत्रधार असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले.
मात्र, आपला कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला विरोधच आहे, असे सांगत पाकिस्तानने या हल्ल्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. भारत सरकार आपल्याच नागरिकांचे शोषण करीत असल्यामुळे त्यांच्याबद्दल भारतातील जनतेतच असंतोष आहे. अशा हल्ल्यांद्वारे या असंतोषाला तोंड फुटत आहे. भारत सरकार मात्र या नाराजीवरून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानवर आरोप करीत आहे, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे.