'पाकिस्तानला त्याची जागा दाखवण्याची गरज'

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती

'पाकिस्तानला त्याची जागा दाखवण्याची गरज'

पुणे: प्रतिनिधी

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला त्याची जागा दाखवण्याची गरज आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या दृष्टीने काही विचार केला असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. 

अजित पवार यांच्या हस्ते कुटुंब कल्याण भवन आणि प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

दहशतवादी भ्याड हल्ले करतात. त्यामध्ये निष्पाप लोकांचे बळी जातात. दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला त्याची जागा दाखवणे आवश्यक आहे. या दहशतवादी हल्ल्याच्या मागे जे कोणी असतील त्यांना भारतीय सेना सोडणार नाही, असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला. 

हे पण वाचा  'कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित शेतीसाठी पाचशे कोटीची तरतूद'

तीन शिफ्ट मध्ये तिघे 24 तास जनतेच्या सेवेत 

राज्यातील सरकार 24 तास जनतेच्या सेवेत असते, असा दावा करून अजित पवार म्हणाले की, मी पहाटे चार वाजता उठतो. चालून, व्यायाम करून पुढे दहा ते अकरा वाजेपर्यंत काम करतो. अकराच्या पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे काम पार पाडतात तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री दोन ते चार या वेळेत सुद्धा जनतेची कामे करीत असतात, त्यामुळे आम्ही 24 तास जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत असतो, असे पवार यांनी सांगितले. 

सरकारी कार्यालय अद्ययावत बनविणार

राज्यात कोणतेही शासकीय कार्यालय भाडेतत्त्वावर असणार नाही यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व शासकीय कार्यालय अद्ययावत करून जनतेला सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. दोन ते तीन वर्षात सर्व कार्यालय उभारणीचे काम पूर्ण करण्याचे आम्ही ठरवले आहे. सध्या पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळात बांधल्या जाणाऱ्या शासकीय इमारतींमध्ये वाहन तळाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे शासकीय कार्यालयांवर सोलर पॅनल बसून वीज निर्मितीचे काम केले जाणार आहे. आरोग्याच्या सर्व सुविधा देखील एकाच छताखाली देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे पवार यांनी सांगितले. 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt