'कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित शेतीसाठी पाचशे कोटीची तरतूद'

उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा

'कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित शेतीसाठी पाचशे कोटीची तरतूद'

पुणे: प्रतिनिधी 

राज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेती करण्यासाठी सहा पिकांची निवड करण्यात आली असून त्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. 

साखर संकुल येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी आयोजित बैठकीनंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. 

शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे उत्पादन क्षमता वाढते, पाण्याची आणि रासायनिक खतांची बचत होते, मातीची सुपीकता वाढते. त्यामुळे राज्यात शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ऊस, कापूस, सोयाबीन, कांदा, भात आणि मका या सहा पिकांची निवड करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. 

हे पण वाचा  BARTI NEWS | संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बार्टीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!

कुटुंब म्हणून एकत्र येणे ही महाराष्ट्राची परंपरा

साखर संकुल आतील ही बैठक पार पडल्यानंतर शरद पवार हे आपल्या दालनात गेले. त्यांच्या पठोपाठ अजित पवार हे देखील आत गेले. त्यांच्यामध्ये सुमारे अर्ध्या तासाची चर्चा झाली. या चर्चेचा विषय काय होता,  हे स्पष्ट होऊ शकले नाही. जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने पवार कुटुंबीयांचे एकत्र येणे, रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीच्या निमित्ताने झालेली शरद पवार आणि अजित पवार भेट अशा पंधरा दिवसांच्या कालावधीत झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात काका पुतण्या एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यातच अजित पवारांनी शरद पवार एकत्रच आहेत, असे विधान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, कौटुंबिक कार्यक्रमांसाठी एकत्र येणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि मी विश्वस्त आहे. मी विश्वस्त या नात्याने त्या बैठकीला गेलो होतो उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे. शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता येईल का, यावर आमच्यात चर्चा झाली, असे अजित पवार यांनी सांगितले. या भेटीन बद्दल बाकीच्यांनी फार चर्चा करण्याची गरज नाही, असे खोचक विधानही त्यांनी केले. 

... त्यावर प्रतिक्रिया देण्याचा मला अधिकार नाही

पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते माजी आमदार संग्राम थोपटे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याबद्दल अजित पवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी यावर, मग मी काय करू, असा प्रतिसवाल केला. ते यापूर्वी एका पक्षाचे आमदार होते. आता ते पराभूत झाले आहेत. यापुढे त्यांनी काय करावे, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा अधिकार मला नाही, असेही पवार म्हणाले. 

 

 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt