शेतकऱ्याच्या विहिरीतून चोरले चक्क पाच टँकर पाणी
मोटर आणि वीज वहन यंत्रणेची मोडतोड
बीड: प्रतिनिधी
चार दिवस परगावी गेलेल्या शेतकरी कुटुंबाने परतल्यावर पाहिले तर त्यांच्या विहिरीतून चार- पाच टँकर पाणी गायब झालेले दिसले. चोरट्यांनी एवढ्यावरच न थांबता विहिरीवरील मोटर आणि वीज पुरवठा करणाऱ्या डीपीची मोडतोड केल्याचेही आढळून आले.
साक्षाळ पिंपरी गावातील रंभा आणि त्र्यंबक काशीद हे शेतकरी पती पत्नी चार दिवसांसाठी नातेवाईकांच्या गावी गेले होते. परत आल्यावर पाहिले तर विहिरीतील पाणी तळाला गेलेले! तळाशी गाळयुक्त गढूळ पाणी तेवढे शिल्लक होते.
काशीद यांची केवळ तीन एकर शेतजमीन आहे. या जागेत त्यांनी फळबाग लावली आहे. मागच्या वर्षी पाणी न मिळाल्यामुळे झाडे सुकून गेली. त्यामुळे काशीद यांनी शेतात विहीर घेतली. यावर्षी उन्हाळ्यातही विहिरीत थोडाफार पाणीसाठा शिल्लक होता.
मात्र, गावावरून आल्यावर विहिरीने तळ गाठल्याचे पाहून काशीद यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. आता या प्रकारात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने पुढाकार घेतला आहे. बीड पोलिसांनी पाणीचोरांना लवकरात लवकर गजाआड करण्याची मागणी त्यांनी केली आहे.