'देशाची बदनामी थांबवा व जनतेचा विश्वास संपादन करा'
देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांना सल्ला
मुंबई: प्रतिनिधी
जगभरात देशाची आणि संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांची बदनामी करून मते मिळणार. नाहीत. त्यासाठी जनतेत जाऊन त्यांचा विश्वास संपादन करा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिला आहे.
गांधी यांनी अमेरिकेतील अनिवासी भारतीय आणि उद्योजक यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी देशातील निवडणूक यंत्रणांवर कडक शब्दात ताशेरे ओढले. विशेषत: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाले. या वेळी २ तासाच्या काळात तब्बल ६५ लाख मतदारांनी मतदान केले. एवढ्या वेळेत एवढे मोठ्या संख्येने मतदान होणे प्रत्यक्षात शक्य नाही, असा दावा करीत गांधी यांनी निवडणूक यंत्रणेवर ठपका ठेवला.
गांधी यांच्या या आरोपांबद्दल फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गांधी यांचा पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सातत्याने पराभव पत्करत आहेत. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली या राज्यात त्यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
गांधी हे सातत्याने विदेशात जाऊन भारताची, भारतीय लोकशाहीची, संवैधानिक संस्थांची बदनामी करत आहेत. कोणताही देशभक्त असे कृत्य करणार नाही. असे केल्याने तुम्हाला मते मिळणार नाहीत. निवडणुकीत विजय मिळवायचा असेल तर जनतेकडे जा. जनतेचा विश्वास संपादन करा, असे फडणवीस म्हणाले. जगात भारताची बदनामी केल्यामुळे तुमचीच उंची कमी होईल, असेही त्यांनी गांधी यांना सुनावले.