पाकिस्तानमध्ये 'दीपेंद्रसिंह हुड्डा' या नावाची वाढती दहशत
पाकिस्तानात 'गुगल सर्च'वर सर्वाधिक शोधले जात आहे हे नाव
इस्लामाबाद: वृत्तसंस्था
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये युध्दाच्या शक्यतेचे मळभ दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे पडसाद माहितीच्या आंतरजालातही उमटत आहे. अर्थातच 'इंडो-पाक वॉर, इंडीयन सर्जिकल स्ट्राईक, इंडो-पाक बॉर्डर,' यांचा शोध इंटरनेटवरून पाकिस्तानात घेतला जात आहे. त्यातच दीपेंद्रसिंह हुड्डा या नावाचाही समावेश आहे.
कोण आहेत दीपेंद्रसिंह हुड्डा?
दीपेंद्रसिंह हुड्डा हे भारतीय लष्कराचे निवृत्त उप लष्करप्रमुख आहेत. भारतात उरी या ठिकाणी १८ सप्टेंबर २०१६ या दिवशी दहशतवादी हल्ला झाला. त्याचा बदला घेण्यासाठी भारताने हल्ल्याच्या दहाव्याच दिवशी २८ सप्टेंबरला पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. या हल्ल्यात भारतीय कमांडो पथकाने नियंत्रण रेषा पार करून दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. या मोहिमेचे नियोजन आणि नेतृत्व लेफ्टनंट जनरल हुड्डा यांनी केले होते.
सियालकोटचा शोधही पाकिस्तानात ट्रेंडींग
पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी २८ निष्पाप नागरिकांचा निर्घृणपणे बळी घेतल्यानंतर भारतभर उसळलेली संतापाची लाट आणि भारत सरकारची आक्रमक भूमिका पाहता यावेळी होणारा हल्ला हा सर्जिकल स्ट्राईकसारखा मर्यादित व प्रतिक्रियात्मक स्वरूपाचा असणार नाही. यावेळी भारत व्यापक युद्धाची आघाडी उघडेल, अशी भीती पाकिस्तानात निर्माण झाली आहे. अशी आघाडी उघडण्यासाठी सियालकोट हे अधिक योग्य ठिकाण असल्याची समजूत पाक नागरिकांचीच नव्हे तर नापाक सैन्याचीही आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याने तिथे रडार यंत्रणा तैनात केली आहे तर नागरीक इंटरनेटच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या घडामोडींची माहिती घेत आहेत.