'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी आम्हाला नको'
भारत, पाकिस्तान संघर्षाबाबत आठवले यांची भूमिका
जालना: प्रतिनिधी
पाकव्याप्त जम्मू काश्मीर भारताला मिळाला पाहिजे आणि दहशतवादाला पोसणे पाकिस्तानने थांबवायला हवे. त्यासाठी पाकिस्तानशी संघर्ष क
रून वेळ पडली तर संपूर्ण पाकिस्तान ताब्यात घ्यायला हवा. त्यासाठी आम्हाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किंवा अन्य कोणाचीही मध्यस्थी नको आहे, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
ट्रम्प यांच्या बद्दल आपल्या मनात आदराची भावना आहे. मात्र, पाकिस्तानच्या विषयात त्यांची मध्यस्थी आम्हाला नको आहे. पाकिस्तान हा दहशतवादाला खतपाणी घालणारा देश आहे. दहशतवादी कारवाया थांबल्या आणि पाकव्याप्त भूप्रदेश आम्हाला मिळाला तर पाकिस्तानशी थेट चर्चा करण्याची आमची तयारी आहे, असे आठवले यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानने आपला पराभव मान्य केला आहे. युद्धबंदीचा प्रस्ताव त्यांनीच मांडला आहे, असेही ते म्हणाले.
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना केंद्रीय योजनेद्वारे दिली जाणारी मदत किंवा अनुदान बंद करण्यात येणार नाही, असेही आठवले यांनी स्पष्ट केले. देशभरात दरवर्षी अडीच लाख आंतरजातीय विवाह होतात. हे समाज जवळ येत असल्याचे लक्षण आहे, असेही ते म्हणाले.
राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहिणी योजनेसाठी वळवण्यात येत असल्याचा आरोप मंत्री संजय शिरसाट यांनी केला होता. तसे होत असेल तर ते योग्य नाही, असे आठवले म्हणाले. सामाजिक न्याय विभाग वगळता असे अनेक विभाग आहेत, ज्यांचा निधी वर्ग करणे शक्य आहे. सामाजिक न्याय विभागातून गोरगरिबांना दिला जाणारा निधी दुसऱ्या योजनेत वळवणे योग्य नाही. सामाजिक न्याय विभागाचा निधी इतर विभागाकडे वळवला जाऊ नये यासाठी कर्नाटकने कायदा केला आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील कायदा केला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.