मोहम्मद युनूस यांची लवकरच हकालपट्टी?
त्वरित निवडणूक घेण्याचा लष्कर प्रमुखांचा आग्रह
ढाका: वृत्तसंस्था
बांगला देशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यामुळे देशाच्या कारभारात विदेशी शक्तींचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप लष्करप्रमुख जनरल वकार उज् जमान यांनी केला आहे. युनूस यांना पदावरून दूर करून देशात लवकर निवडणूक घेण्याच्या दृष्टीने जमान यांनी लष्कराची तातडीची बैठक बोलवली आहे.
बांगलादेशमध्ये युनूस आणि लष्करप्रमुख जमान यांचे संबंध ताणलेले आहेत. युनूस हे विदेशी शक्तींच्या हातातील बाहुले असल्याचा लष्करप्रमुखांचा आरोप आहे. लवकर निवडणूक घेण्याचा त्यांचा आग्रह आहे. दुसरीकडे युनूस हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खलील उर रहमान यांच्या साथीने लष्करप्रमुखांना पदावरून हटवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
युनूस आपल्या अनुपस्थितीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची नियुक्ती करून लष्करात फूट पाडतील आणि आपल्या अधिकाराचा वापर करून कारागृहात डांबलेल्या कैद्यांना मुक्त करतील, अशी चिंता लष्करप्रमुखांना भेडसावत आहे. त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका घेण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी त्यांनी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. सैन्याच्या बहुतेक अधिकाऱ्यांचा लष्कर प्रमुख जमान यांना पाठिंबा आहे. देशात लवकरात लवकर निवडणुका व्हाव्या, अशीच लष्करी अधिकाऱ्यांची देखील इच्छा आहे.