'राहुल व सोनिया गांधी यांनी गुन्हेगारी कृत्यातून मिळवले 142 कोटी'
नॅशनल हेरॉल्ड प्रकरण सक्त वसुली संचालनालयाचा न्यायालयात दावा
नवी दिल्ली: प्रतिनिधी
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेसचे सर्वोच्च नेते सोनिया व राहुल गांधी यांनी गुन्हेगारी कृत्यांद्वारे तब्बल 142 कोटी रुपयांचा फायदा मिळवला आहे, असा दावा सक्तवसुली संचालनालयाच्या वतीने न्यायालयात करण्यात आला.
अतिरिक्त अधिवक्ता एस व्ही राजू यांनी न्यायालयाला सांगितले की, सोनिया आणि राहुल गांधी यांनी गुन्हेगारी कृतीतून आलेले 142 कोटी रुपये आपल्याजवळ ठेवून घेतले. नोव्हेंबर 2023 मध्ये सक्त वसुली संचालनालयाने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातील सर्व मालमत्ता जप्त करेपर्यंत त्यांनी या संपत्तीचा उपभोग घेतला.
भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातील आरोप पत्र व अन्य कागदपत्रांच्या प्रतींची मागणी केली होती. यासंबंधीची याचिका देखील न्यायालयाने मान्य केली आहे. राहुल आणि सोनिया गांधी यांच्या वतीने ए एम सिंघवी आणि आर एस चीमा या वकिलांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागून घेतली आहे. आपल्याला नुकतीच पाच हजार पानांची कागदपत्र मिळाली आहेत. मे महिना हा कामकाजाच्या दृष्टीने वकिलांसाठी धावपळीचा ठरतो. त्यामुळे या कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यापरत मुदत मिळावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली.