विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी शाळेतच दाखल्याची सेवा - मंडल अधिकारी चंद्रकांत जाधव
मसूर : विद्यार्थ्यांसह पालकांचा वेळ व पैसा वाचावा, मानसिक त्रास कमी व्हावा या उद्देशाने शासनाच्या पुढाकाराने महसूल विभागाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी शाळेतच आवश्यक दाखले देण्याची सेवा पूरविली आहे. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा भविष्यात चांगला अभ्यास करावा. विविध क्षेत्रात आपले नैपुण्य दर्शवावे. परिश्रम घेतल्यास विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत नक्कीच संधी आहे. त्यासाठी ध्येय ठेवा.. यश नक्की मिळेल असे प्रतिपादन कवठे विभागाचे मंडलाधिकारी चंद्रकांत जाधव यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत प्रांत अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कवठे (मसूर) ता. कराड येथील श्री जोतिर्लिंग विद्यालयातील विद्यार्थ्यांना डोमासाईल, उत्पन्नाचा दाखला व अन्य शैक्षणिक दाखल्यांचे वाटप करण्यात आले, त्याप्रसंगी बोलताना केले. शाम-शरद शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुनीलराव पाटील अध्यक्षस्थानी होते. केंद्रप्रमुख गणेश जाधव, तलाठी विशाल बाबर, मुख्याध्यापक प्रदीप पाटील, उपशिक्षक सुनील साळुंखे प्रमुख उपस्थित होते.
केंद्रप्रमुख गणेश जाधव यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक प्रदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. क्रीडा शिक्षक दिलीप माने यांनी सूत्रसंचालन केले. उपशिक्षक राजेंद्रप्रसाद चव्हाण यांनी आभार मानले. सुरेश सूर्यवंशी, नितीन यादव, दीपक दाभाडे व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
प्रांत अतुल म्हेत्रे व तहसीलदार ढवळे यांनी शासनाच्या माध्यमातून पुढाकार घेत विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील प्रवेशासाठी शाळेतच शैक्षणिक दाखले देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. वेळ व पैसा खर्च करून विद्यार्थी व पालकांना तहसील व सेतू कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत होता. शिवाय जास्तीत जास्त पालक हे शेतकरी वर्गातील असल्याने त्यांना जून महिन्यात शेतीची कामे असतात. कामे बाजूला ठेवून त्यांना पाल्याच्या दाखल्यासाठी भटकंती करावी लागत होती. ती या उपक्रमामुळे थांबली आहे. या अत्यंत स्तुत्य उपक्रमाचे सर्व पालक वर्गातून स्वागत व कौतुक होत आहे. - सुनीलराव पाटील.