'बातम्या दाखवताना दृश्यांबाबत नियमांचे पालन करा'
माहिती व प्रसारण विभागाची वृत्तवाहिन्यांना सूचना
वृत्तवाहिन्यांनी बातम्या प्रसारित करताना त्याच्याशी संबंधित दृश्य योग्य प्रमाणात संकलीत केली जातील याची काटेकोर काळजी घेऊन तत्संबंधी नियमांचे कटाक्षाने पालन करावे, अशी सूचना माहिती व प्रसारण विभागाने केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्या कार अपघाताच्या बातम्या दाखविताना अयोग्य प्रकारे दृश्य प्रसारित करण्यात आल्याची दखल घेऊन या सूचना करण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली: प्रतिनिधी

ऋषभच्या अपघाताची भीषण दृश्य, अन्य काही बातम्यांमध्ये दाखविण्यात आलेली मृतदेह, लहान मुलांना मारहाण करणे अशा प्रकारची दृश्य प्रसारित करणे हे अभिरुचीहीन आहे. अशा दृश्याचे नीट संकलन व्हावे यासाठी वाहिन्यांनी आपल्या यंत्रणांमध्ये आणि कार्यपद्धतीमध्ये आवश्यक त्या सुधारणा कराव्या, असेही माहिती व प्रसारण मंत्रालयाने नमूद केले आहे. विशेषतः अपघात, हिंसाचार, गुन्हेविषयक बातम्यांच्या प्रसारणाच्या वेळी योग्य ती काळजी घ्यावी आणि समाजमाध्यमातून घेतलेले चित्रण व छायाचित्र योगया प्रकारे संकलीत करावी, असेही वाहिन्यांना सांगण्यात आले आहे.
वाहिन्यांनी अनेकवेळा मृतदेह, रक्ताच्या थारोळ्यात जखमी व्यक्तींची छायाचित्र, मारहाण होत असताना आक्रोश करणारी लहान मुले, महिला, वृद्ध अशी दृश्य अनेकदा दाखविली आहेत. ती प्रसारित करताना चेहरा अस्पष्ट करण्याची काळजी घेतलेली नाही. तसेच अशी दृश्य वारंवार आणि अधिक वेळ दाखविण्याचे टाळलेले दिसून येत नाही, याकडे विभागाने लक्ष वेधले आहे. तसेच अशी दृश्य 'क्लोज अप'मध्ये न दाखविता 'लॉंग शॉट्स दाखविण्याची काळजी घेतलेली नाही, असे निरीक्षणही नोंदविण्यात आले आहे.
अशा दृश्यांचे प्रसारण लहान मुलांच्या मानसिकतेला धक्का पोहोचवू शकतात. तसेच अशी दृश्य दाखविणे हे संबंधित लोकांसाठी मानहानीकारक आणि खाजगीपणाचा हक्क हिरवणारे ठरू शकते, याची जाणीवही वाहिन्यांना करून देण्यात आली आहे.
Comment List