'भाजपजवळ स्वतःचे काही उरलेच नाही...'
फोडाफोडीच्या राजकारणावर संजय राऊत यांची टीका
केवळ सत्ता मिळवण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण करताना भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचे असे काहीच उरले नाही, अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे. दीर्घकालीन राजकारणासाठी स्वतःची पक्ष संघटना वाढवा, नेते, कार्यकर्ते घडवा, असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला आहे.
मुंबई: वृत्तसंस्था
केवळ सत्ता मिळवण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण करताना भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचे असे काहीच उरले नाही, अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे. दीर्घकालीन राजकारणासाठी स्वतःची पक्ष संघटना वाढवा, नेते, कार्यकर्ते घडवा, असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला आहे.
सध्याच्या काळात महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या मोठ्या प्रमाणात अस्थिर बनला आहे, असे राऊत यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपवर ओझे बनले आहेत. शिंदे हे कधीच 'मास लीडर' नव्हते. त्यांच्यामागे आमदार गेले. खासदार गेले. सर्वसामान्य जनता मात्र आमच्याच पाठीशी आहे. कार्यक्रम उद्धव ठाकरे यांच्या सभांना होणारी लाखालाखाची गर्दी याची साक्ष आहे, असा दावाही त्यांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता शिंदे यांना नव्हे तर भाजपला धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कधीही लागू शकतो. त्यामध्ये बंडखोर 16 आमदार अपात्र ठरवले जातील याची आम्हाला खात्री आहे. तसे झाल्यास मुख्यमंत्री शिंदे हे देखील अपात्र ठरतील. अर्थातच शिंदे फडणवीस सरकार धोक्यात येईल. याच गोष्टीची भाजपला धास्ती आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री साताऱ्यात जाऊन बसले आहेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत ते कोणालाच माहिती नाही.
सरकारबाबतची अनिश्चितता आणि हतबलता यातूनच सरकार वाचविण्याचा 'प्लान बी' म्हणून भाजप अजित पवार यांच्या नाराजी आणि बंडखोरीबद्दल अफवा पसरवत आहे. वास्तविक अजित पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे आणि त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, असे राऊत यांनी नमूद केले.
महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या विधानाचा विपर्यास केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आहेत. एकत्रच राहू आणि एकत्र निवडणुका लढवू. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने घटक पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा होणे आवश्यक आहे, एवढाच पवार यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे, असेही राऊत म्हणाले.