'नानांना हटवा काँग्रेस वाचवा'
राज्यातील पक्ष नेत्यांनी घातले दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना साकडे
नवी दिल्ली: प्रतिनिधी
कर्नाटक विजयानंतर उत्साहीत झालेली काँग्रेस पक्षांतर्गत मतभेद मिटवण्यासाठी पुढे सरसावली असतानाच महाराष्ट्रातील अंतर्गत मतभेदांनी पुन्हा डोके वर काढले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात राज्यातील बड्या नेत्यांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे पुन्हा एकदा तक्रारीचा पाढा वाचला आहे. एकली कारभार करणाऱ्या नानांना हटवा आणि राज्यातील काँग्रेस वाचवा, असे आवाहन या नेत्यांनी पक्षाकडे केले आहे.
नाना पटोले हे इतरांना विश्वासात न घेता आपल्याच तंत्राने मनमानी कारभार करीत आहेत. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना ते जुमानत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणे अशक्य आहे अशी अनेकांची भावना बनली आहे. अर्थातच महाराष्ट्रातील काँग्रेस टिकवायची असेल तर पटोले यांना पदावरून दूर करण्याशिवाय पर्याय नाही, अशी तक्रार माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली आहे.
खर्गे यांनी याबाबत त्वरित कोणताही निर्णय घेतला नसला तरीही या नेत्यांच्या तक्रारीची दखल घेतल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर महाराष्ट्रातील पक्ष संघटनेबाबत विचार करू, असे आश्वासन त्यांनी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले असल्याचे पक्षाच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
Comment List