'महिलेवर अमानवीय हल्ल्याप्रकरणी सखोल तपास व्हावा'

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या महत्त्वाच्या सूचना

'महिलेवर अमानवीय हल्ल्याप्रकरणी सखोल तपास व्हावा'

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगरच्या घारदोन येथे ६ मार्च रोजी घडलेल्या महिलेवरील अमानुष हल्ल्याच्या घटनेवर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेत अभिषेक नवपुते नावाच्या तरुणाने त्याच्याच भावकीतील एका महिलेवर अत्यंत क्रूर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. पीडितेच्या संपूर्ण शरीरावर वार केल्यामुळे तिला तब्बल २५०-३०० टाके घालावे लागले. या घटनेचा सखोल तपास होऊन आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विनयकुमार राठोड यांच्याकडे केली आहे. सदर घटना शिवसेनेच्या छत्रपती संभाजीनगर येथील महिला संपर्क प्रमुख प्रतिभा जगताप यांनी निदर्शनास आणून दिली आहे.

विशेष महिला पोलीस अधिकारी नियुक्त करा

महिलेवरील या क्रूर हल्ल्याची सखोल चौकशी व्हावी, यासाठी विशेष वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी नियुक्त करण्याची मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हा तपास झाल्यास पीडितेला न्याय मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

हे पण वाचा  रिपब्लिकन पक्षाची (आठवले) पुणे शहर कार्यकारणी बरखास्त

खटला द्रुतगती न्यायालयात चालवण्याची शिफारस

या प्रकरणात आरोपीला जामीन मिळू नये आणि त्याला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी शिफारस करण्यात आली आहे, असे केल्यास आरोपीला जामीनावर सोडता येणार नाही.

ग्रामीण भागात "पोलीस दीदी" योजना राबवावी

महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी ग्रामीण भागात "पोलीस दीदी" ही योजना तातडीने राबवण्यात यावी, अशीही मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे. या उपक्रमामुळे महिला थेट पोलिसांशी संवाद साधू शकतील आणि त्यांचे प्रश्न तातडीने सोडवता येतील.

शहर आणि ग्रामीण भागात पोलीस गस्त वाढवावी

महिला सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालय परिसर, बाजारपेठ, तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा उपाय महत्त्वाचा ठरेल.

छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी

महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसू शकेल, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणातील पुढील कारवाई आणि तपास अहवाल तातडीने उपसभापती कार्यालयास सादर करण्याचे निर्देशही डॉ. गोऱ्हे यांनी दिले आहेत.

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt