'देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा'
बारामतीच्या मोर्चात आंदोलकांची मागणी
बारामती: प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा केवळ राजीनामा पुरेसा नाही. त्यांची आमदारकी रद्द करा. त्यांना सहआरोपी करा आणि या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा मागण्या बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ येथे सर्वधर्मीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांचे नातू आणि पक्षाचे नेते युगेंद्र पवार सहकुटुंब सहभागी झाले.
धनंजय मुंडे यांनी अखेर मंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र, राजीनामा द्यायला तीन महिन्याचा कालावधी का लागला, असा सवाल युगेंद्र पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला. या प्रकरणात धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांना सहआरोपी करा, अशी मागणी देखील त्यांनी केली. महाराष्ट्रात यापूर्वी अशा प्रकारच्या अमानुष घटना घडत नव्हत्या. सध्याच्या काळात मात्र राज्यात कायदा सुव्यवस्था स्थिती अस्तित्वात आहे की नाही, असा सवाल निर्माण झाला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.