कन्हेरीच्या मारुतीरायाचे मत कोणाच्या पारड्यात?
या मंदिरातून प्रचाराचा शुभारंभ करण्याची पवारांची परंपरा
पुणे: प्रतिनिधी
राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणावर प्रभाव असलेल्या पवार कुटुंबीयांनी राजकारणात पुरोगामी विचारांची कास धरली असली तरीही पवार अश्रद्ध किंवा नास्तिक नाहीत. बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील मारुतीरायावर पवार कुटुंबीयांची श्रद्धा आहे. या निवडणुकीत पवार कुटुंबातील दोन सदस्य एकमेकांसमोर उभे ठाकल्याने हा कनेरीचा मारुतीराया आपली कृपादृष्टी नेमकी कोणावर ठेवणार, याची उत्कंठा लागून राहिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ होत आहे. पवार कुटुंबाच्या परंपरेप्रमाणे कन्हेरीच्या मारुती मंदिरात नारळ वाढवून प्रचार मोहीम सुरू केली जाणार आहे. त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात असलेल्या त्यांच्याच वहिनी सुनेत्रा पवार यादेखील दि. 20 रोजी कन्हेरीच्या मंदिरातूनच प्रचार मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत.
माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी राजकारणात पदार्पण केल्यापासून प्रचाराची सुरुवात कनेरी येथील मारुती मंदिरातून करण्याचा प्रघात पडला आहे. पवार कुटुंबातील राजकारणात आलेल्या इतर व्यक्तींनी देखील ही परंपरा कायम ठेवली आहे. या निवडणुकीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवीत आहेत. मारुतीरायाच्या चरणी प्रचाराचा शुभारंभ करण्याची परंपरा दोघीही पाळत आहेत. आता हा मारुतीराया आपले मत कोणाच्या झोळी घालणार, याची उत्सुकता आहे.
Comment List