'... अन्यथा भंग होते विश्वगुरूंची तपश्चर्या'
खासदार संजय राऊत यांचा पंतप्रधानांना उपरोधिक टोला
मुंबई: प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वगुरू आहेत. महामानव आहेत. त्यांना जगाच्या समस्या सोडवायच्या आहेत. त्यामुळे त्यांना देशातील समस्यांबाबत प्रश्न विचारू नका. अन्यथा त्या विश्वगुरूंची तपश्चर्या भंग होईल, अशा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपरोधिक टोला लगावला आहे.
पंतप्रधान मोदी सध्या पोलंड आणि युद्धग्रस्त युक्रेनच्या दौऱ्यावर आहेत. ओलांड येथे बोलताना मोदी यांनी जगाला युद्ध परवडणार नसल्याचे सांगितले. जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची आवश्यकता आहे, असे सांगत मोदी यांनी जागतिक शांतता आणि सौहार्दाचे महत्त्व विशद केले. त्यांच्या या वक्तव्याची राऊत यांनी खिल्ली उडवली आहे.
मोदी यांनी पोलंडला शांततेचे महत्त्व सांगितले. नंतर ते युक्रेनच्या युद्धभूमीवर जाणार आहेत. मोदी हे महान व्यक्तिमत्व आहे. त्यांना जगासमोरच्या समस्या सोडवायच्या आहेत. त्यामुळे ते रशियाचे राष्ट्र प्रमुख व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर चहा पिऊन आले. आता ते युक्रेनला गेले आहेत. देशातल्या लहानसहान समस्या सोडवण्यासाठी ते पंतप्रधान झालेले नाहीत, असे राऊत म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांची 25 तारखेला जळगाव येथे जाहीर सभा होणार आहे. त्यांना येऊ द्या. मात्र, त्यांना देशातील महिलांवर होणारे अत्याचार, शेतकऱ्यांच्या अडचणी, कापूस,कांद्याचा प्रश्न अशा किरकोळ समस्यांबाबत काहीही विचारू नका. अशा किरकोळ समस्या सोडविणे हे त्यांचे काम नाही. त्यामुळे त्यांची तपश्चर्या भंग होऊ शकते, असेही राऊत म्हणाले.
Comment List