'... या तुफानापुढे तुमचे वाजणार बारा'
'घड्याळ तेच, वेळ बदलली,'ची गोरे यांनी उडवली खिल्ली
पुणे: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी समाज माध्यमांवर 'घड्याळ तेच, वेळ नवी,' या नावाने खाती उघडण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनियुक्त प्रदेश प्रवक्ते शरद गोरे यांनी या टॅगलाईनचीच खिल्ली उडवली आहे.
'अजितदादा आपले म्हणणे बरोबर आहे. घड्याळ तेच पण वेळ बदलली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार नावाच्या तुफानामुळे तुमचे आणि तुमच्या महायुतीचे बारा वाजणार हे नक्कीच, असा दावा गोरे यांनी केला आहे. कोणाचे बारा कसे वाजवायचे याची कला शरद पवार यांनी चांगलीच आत्मसात केली आहे, असेही ते म्हणाले.
गुलाबी कोट घालून प्रचार करण्याच्या अजित पवार यांच्या उपक्रमावरही गोरे यांनी कठोर शब्दात टीका केली. आधुनिक काळातील अनाजीपंतांच्या नादी लागून स्वपक्षाच्या, शरद पवार यांच्या राजकीय वाटेवर काटे पेरणाऱ्या खंडोजी खोपडे यांच्या तोंडी गुलाबाची भाषा शोभत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्रातील नीतिमत्तेची बूज राखणाऱ्या जनमताच्या रेट्यात सर्व गद्दार वाहून गेल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही गोरे यांनी दिला.