व्यवस्थेतील भ्रष्टाचारामुळे देशात घुसखोरीला प्रोत्साहन - ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय
हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान तर्फे सातुर्डेकर व मोरे महाराज यांना पुरस्कार
पिंपरी, पुणे
भारतामध्ये सद्यस्थितीला सहा कोटी पेक्षा जास्त घुसखोरांची संख्या आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षितता, एकता, अखंडता धोक्यात आहे. याला व्यवस्थेतील भ्रष्टाचार हे मूळ कारण आहे. हा एक देशद्रोह व संघटित अपराध आहे. हे रोखण्यासाठी देशात पुरेसे कायदे आहेत, परंतु त्याची कडकपणे अंमलबजावणी होत नाही. आता सर्वसामान्य नागरिकांनीच लोकप्रतिनिधींवर दबाव निर्माण करून देशातील शिक्षण व कायदा व्यवस्था बदलण्यासाठी काम केले पाहिजे असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी केले.
रविवारी (दि.६) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सव व विजयादशमीनिमित्त हिंदू शौर्य दिन - विराट हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी स्व. संजय आर्य स्मृती दिनानिमित्त आद्य पत्रकार देवर्षी नारद राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांना आणि स्व. प्रा. एकनाथजी नाणेकर स्मृती समाजभूषण पुरस्कार शिवशंभो विचार मंचचे प्रांत संयोजक हभप शिरीष महाराज मोरे यांना
ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. संजय उपाध्ये, हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, ॲड. उपाध्याय यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सचिव उत्तम दंडीमे, समन्वयक कैलास बारणे, सुहास पोफळे, दत्तात्रय सूर्यवंशी, अतूल आचार्य, कुमार जाधव, नामदेव शिंत्रे, विजय गुंजाळ, दिगंबर रिद्धीवाडे, मनोज बोरसे, शिवाजी रेड्डी, मनोज गोबे, दिलीप कुलकर्णी, रमेश अर्धाले आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे संस्थापक पंडित धर्मवीर आर्य आणि हरिकृष्ण वाफता यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
ॲड. उपाध्याय यांनी सांगितले की, भारताला इंग्रज, मुघलांनी लुटले नाही एवढे भ्रष्टाचाऱ्यांनी लुटले आहे. त्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. भ्रष्टाचार, धर्मांतर, जनसंख्येचा विस्फोट, युवकांमध्ये व्यसनाधीनता आणि अश्लीलता यामुळे देश आतून पोखरला जात आहे. भारतातील ९ राज्य, २०० जिल्हे १५०० तालुक्यांमध्ये हिंदू लोकसंख्या अल्प प्रमाणात आहे, याला वरील कारणे जबाबदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी कडक कायदे करून त्याची अंमलबजावणी केली होती. त्यांच्यामुळेच मुघलांना दक्षिणेवर आक्रमण करणे शक्य झाले नाही, आजही दक्षिणेमध्ये बालविवाह, घुंगटप्रथा किंव्हा रात्रीचे विवाह होत नाहीत. पाश्चात्य संस्कृतीचे प्रमाण उत्तरेत जास्त आहे. सर्वसामान्य नागरिकांनी आता पुढार्यांच्या आश्वासनांना बळी न पडता शिक्षण आणि कायदा व्यवस्थेत बदल करण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे असेही ॲड. उपाध्याय म्हणाले.
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले की, जातीजातींमधला भेदभाव दूर करून सर्वांनी हिंदू म्हणून ओळख निर्माण करावी. तसेच अध्यात्मिक भेदभाव देखील संपला पाहिजे तरच देशाचा सर्वांगीण विकास होईल.
सत्काराला उत्तर देताना पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर म्हणाले की, वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरुद्ध जनमत जागृत करण्यासाठी लोकमान्य टिळकांसारख्या नेत्यांनी लेखणी हाती घेतली. स्वातंत्र्योत्तर काळात वाचकांना आदर्श लोकशाहीचे धडे देण्यासाठी, देशवासीयांचे जीवन सुकर करण्यासाठी पत्रकारांनी चांगली कामगिरी केली. आणीबाणीतील अत्याचारांविरोधात जनजागृती, बोफोर्स प्रकरण, तहलका प्रकरण, शिवानी भटनागर प्रकरण, टू जी, स्पेक्ट्रम घोटाळा, आदर्श घोटाळा अशा अनेक विषयांना पत्रकारांनी वाचा फोडली. मात्र गेल्या काही वर्षापासून व्यावसायिकतेचा अतिरेक झाल्याने व चुकीच्या व्यक्ती पत्रकारितेत आल्याने पत्रकारितेचे अध:पतन होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांची पत्रकारिता व रामशास्त्री प्रभुणेंचा करारी बाणा हे आदर्श समोर ठेवून वाटचाल करावी लागेल. त्यासाठी वाचक शक्तीचा दबाव महत्त्वाचा आहे.
स्वागत कृष्णकुमार गोयल, प्रास्ताविक व मानपत्र वाचन उत्तम दंडीमे, आभार सुहास पोफळे यांनी मानले.
000
Comment List