काँग्रेसच्या महिला खासदारांनी फोडले मित्र पक्षावर खापर
राज्यातील पक्ष नेतृत्वाबाबतही व्यक्त केली नाराजी
नवी दिल्ली: प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर राज्यातील काँग्रेसच्या महिला खासदारांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन पराभवाचे खापर मित्र पक्षावर फोडले. त्याचप्रमाणे पक्षाच्या राज्यातील नेतृत्वाबाबत, विशेषतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत या खासदारांनी गांधी यांच्याकडे तक्रार केली.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विजयाची खात्री व्यक्त करणाऱ्या महाविकास आघाडीचे पानिपत झाले. आघाडीत सर्वात मोठा पक्ष होण्याच्या आशेवर असलेल्या काँग्रेसलाही या निवडणुकीत उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही. काँग्रेसला केवळ 16 जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर विविध स्तरावरून या प्रभावाची कारण विमा असा केली जात आहे. राज्यातील महिला खासदारांनी घेतलेली राहुल गांधी यांची भेट हा त्याच उपक्रमाचा एक भाग आहे. या भेटीच्या वेळी खासदार प्रियंका गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल हे देखील उपस्थित होते.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून जागा वाटपाच्या वेळी अनेकदा घोळ घालण्यात आले. प्रचारादरम्यान महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये सुसंवादाचा अभाव असल्याचे ठळकपणे दिसून आले. राज्यातील नेतृत्वाने देखील प्रचारादरम्यान स्थानिक खासदारांना विश्वासात घेतले नाही. काँग्रेस संघटनेच्या पातळीवर देखील गोंधळ असल्याचे दिसून आले, असे महिला खासदारांनी राहुल गांधी यांच्या निदर्शनास आणून दिले.
प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतानाच या खासदारांनी त्यांच्यावर गंभीर आरोपही केले. प्रदेशाध्यक्षांनी स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून आपल्या मर्जीतील उमेदवारांना उमेदवारी दिली. त्याची फळे पक्षाला भोगावी लागत आहेत, असे या खासदारांनी सांगितले. या खासदारांमध्ये प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर इत्यादींचा समावेश होता.
Comment List