राज्य मंत्रिमंडळ शपथविधीचा मार्ग खुला
गृहमंत्री पदाचा वाद मिटल्याचा सूत्रांचा दावा
मुंबई: प्रतिनिधी
राज्याच्या गृहमंत्री पदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे मंत्रिमंडळाचा शपथविधी दीर्घकाळ रखडला आहे. मात्र, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर गृहमंत्री पदाचा वाद संपुष्टात आला असून शपथविधीचा मार्ग खुला झाला असल्यास साधावा भाजपाच्या वरिष्ठ सूत्रांनी केला.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दैदिप्यमान कामगिरी केली आहे. महायुतीच्या यशात भाजपचा वाटा सर्वाधिक असल्यामुळे भाजपाने मुख्यमंत्री पदावर दावा केला असून शिंदे गटाला तो मान्य आहे. मात्र, शिंदे गटाकडून उपमुख्यमंत्री पदाबरोबरच गृहमंत्री पद आपल्याला मिळावी अशी आग्रही मागणी केली गेली होती. अर्थातच भाजपचा या मागणीला विरोध होता. त्यातच प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या गावी निघून गेल्यामुळे गृहमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये टोकाचे वाद असल्याच्या चर्चा झडू लागल्या. मात्र, फडणवीस आणि शिंदे यांच्यात चर्चा पार पडल्यानंतर शिंदे यांनी गृहमंत्री पदाचा आग्रह सोडून उपमुख्यमंत्री पद आणि नगर विकास मंत्रीपद मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकीकडे गृहमंत्री पदाचा वाद मिटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार आपल्या मागण्या घेऊन दिल्ली येथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी, विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दोन दिवस चर्चा करून मुंबईकडे रवाना होत आहेत. उपमुख्यमंत्री पद आणि अर्थमंत्री पद अजित पवार यांना मिळणार हे निश्चित आहे. मात्र, अजित पवार यांच्या अतिरिक्त मागण्या काय आहेत आणि भाजप श्रेष्ठी त्या मान्य करणार का, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
Comment List