फडणवीसच असणार नवे मुख्यमंत्री
भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड
मुंबई: प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. अर्थातच, फडणवीस हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असणार आहेत. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळ गटनेते पदासाठी फडणवीस यांचे नाव सुचविणारा प्रस्ताव सादर केला. त्यानंतर बैठकीत उपस्थित असलेल्या भाजप आमदारांनी एकच जल्लोष केला. पंकजा मुंडे यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. उपस्थित आमदारांनी या निवडीवर शिक्कामोर्तब केले.
महायुतीने विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली असली तरीही अनेक दिवस मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित होत नसल्याने राज्यात त्यासंबंधी चर्चांना उधाण आले होते. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा पुढचा मुख्यमंत्री मराठाच असावा, इतर मागास प्रवर्गाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपदाची संधी द्यावी, भाजप नेतृत्व धक्का तंत्राचा अवलंब करून नवा चेहरा मुख्यमंत्रीपदी आणणार, विनोद तावडे किंवा पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार, अशा अनेक प्रकारच्या चर्चा राज्यभरात घडून येत होत्या.
अखेर मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाबरोबर गृहमंत्री पदावरून सुरू असलेला वाद संपुष्टात आणण्याबरोबरच फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करून तेच मुख्यमंत्री असतील, हे भाजपने स्पष्ट केले आहे. उद्या दिनांक ५ रोजी आझाद मैदानावर नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी महायुतीकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.
Comment List