महायुतीने केला सत्ता स्थापनेचा दावा
तिन्ही घटक पक्षांच्या प्रमुखांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई: प्रतिनिधी
अखेर तब्बल 11 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर महायुतीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. संख्यावर सिद्ध करण्यासाठी आमदारांच्या सह्यांसह यादी राज्यपालांकडे सादर करण्यात आली आहे. नव्या सरकारचा शपथविधी उद्या आझाद मैदान येथे होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा समावेश असलेल्या महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवूनसुद्धा मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचे याबाबत सुरू असलेला खल, एकनाथ शिंदे यांच्याकडून गृह मंत्रालयाची मागणी, अशा काही कारणांमुळे बहुमत मिळवूनही महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी तब्बल 11 दिवसांचा कालावधी लागला.
अखेर आज देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पक्ष विधिमंडळ गटनेते पदी निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षात विचार विनिमय करून निर्णय घेतले जात असल्यामुळे गटनेते पदाबाबत निर्णय घेण्यास वेळ लागला, असे स्पष्टीकरण केंद्रीय निरीक्षक विजय रूपाणी यांनी दिले आहे. आता फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्याबरोबरच दोन उपमुख्यमंत्री देखील शपथ ग्रहण करतील. मात्र, काळजीवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का, याबाबतचे प्रश्नचिन्ह अद्यापही कायम आहे.
उद्या आझाद मैदान येथे होणाऱ्या शपथविधी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह तब्बल 22 राज्यांचे मुख्यमंत्री व निमंत्रित सहभागी असणार आहेत. राज्यभरातील लाडक्या बहिणींना या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला तब्बल 40 हजार लोक उपस्थित असणार आहेत.
Comment List