Murgud News | विषबाधेनं सख्या बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू!
मुरगूड : कागल तालुक्यातील चिमगाव इथल्या श्रीयांश रणजित आंगज (वय ५) आणि काव्या रणजित आंगज (८) या सख्ख्या भावंडाचा विषबाधेनं दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. पाहुण्यांनी अंडेला कप केक खाल्ल्यानंतर या दोघांना त्रास झाला होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी, चिमगाव येथील रणजित आंगज हे पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरीस होते. काही वर्षांपूर्वी कुटुंबासह ते मूळ गावी चिमगाव इथं राहण्यास आले. सोमवारी पाहुण्यांनी आणलेला केक काव्या आणि श्रीयांश यांनी खाल्ले होते. त्यानंतर त्यांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले. सोमवारी रात्री दोघांनाही मुरगूडमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. श्रीयांश याची तब्येत चांगली असल्यानं त्याला घरी सोडलं. काव्यावर मात्र तातडीनं उपचार सुरू केले. मंगळवारी पहाटे श्रीयांश याची तब्येत अचानक बिघडली. त्याला तत्काळ मुरगूडच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, सकाळी आठच्या सुमारास श्रीयांशचा मृत्यू झाला. दरम्यान, श्रीयांश याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करत असताना नातेवाइकांना काव्याची तब्येत बिघडल्याची माहिती समजली. श्रीयांशवर अंत्यसंस्कार झाल्यावर मुरगूडमध्ये उपचार सुरू असणाऱ्या काव्याला कोल्हापूरात खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचार सुरु असताना सायंकाळी सातच्या सुमारास काव्याचा मृत्यू झाला. श्रीयांश याचा मंगळवारी सकाळी, तर काव्या हिचा संध्याकाळी मृत्यू झाला. दोघांचाही मृत्यू विषबाधेनं झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. काव्याचा व्हिसेरा राखून ठेवल्यानं मृत्यूचं नेमकं कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशी हळहळ व्यक्त होत आहे.
Comment List