चक्रीवादळामुळे हिवाळ्यात बरसणार जलधारा
पश्चिम महाराष्ट्रासह धाराशिव, लातूर जिल्ह्यात यलो अलर्ट
पुणे : प्रतिनिधी
फेंगल चक्री वादळामुळे श्रीलंका आणि दक्षिणेतील राज्यात ऐन हिवाळ्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
हिंद महासागरात निर्माण झालेल्या फेंगल या चक्री वादळाचा परिणाम म्हणून तामिळनाडू राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात श्रीलंका, दक्षिणेतील राज्यांचा किनारपट्टीचा भाग, प बंगाल या ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे.
महाराष्ट्रातही या चक्रीवादळामुळे हवामानात बदल दिसून येत आहे. राज्यात मागील दोन दिवसापासून थंडीचा जोर ओसरला आहे. दुपारच्या वेळी उकाडा जाणवू लागला आहे. आगामी काही दिवसात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना वेधशाळेने यलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता हवामानाशास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्याचप्रमाणे नांदेड आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे.
Comment List