कथा देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेची...
मदत करणाऱ्यांच्या मुळापर्यंत जाणार का पोलीस?
बीड: प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी तब्बल 25 दिवस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लपून राहिले कसे आणि पुण्यात ते सापडले कसे याची कथा जितकी थरारक आहे, तितकीच पोलीस यंत्रणेसमोर अनेक प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे. याआधी या खुनाशी संबंधित असण्याची शक्यता असलेल्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड याने देखील पुण्यातच पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यामुळे या प्रकरणाचे आणि आरोपींचे पुणे कनेक्शन काय, असा सवाल केला जात आहे. त्याचप्रमाणे या सर्वांना मदत करणाऱ्यांची पाळीमुळे खणून काढणे, हे आव्हानही पोलिसांसमोर असणार आहे.
देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे तिघेही मुंबई जवळच्या भिवंडी येथे रवाना झाले. तिथे एका राजकीय नेत्याच्या हॉटेलमध्ये सुदर्शन घुले याचा बालमित्र नोकरी करतो. त्याच्याकडून आपल्याला लपून राहण्याची जागा मिळू शकेल, असा त्यांचा विश्वास असावा. मात्र, त्याच्याकडून त्यांना फारशी मदत मिळाली नसावी.
तीन दिवस भिवंडीत राहून त्यांनी भिवंडी सोडण्याचा निर्णय घेतला. यावेळी कदाचित कृष्णा आंधळे आणि इतर दोघे यांचे मार्ग वेगळे झाले असावेत. कारण त्यानंतर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यातून बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलाच्या बाजूला एका खोलीत राहत होते. त्याच ठिकाणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तिसरा प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरारच आहे.
बीड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी काल चौकशीसाठी पाचारण केलेले डॉ. संभाजी रायबसे यांच्याकडून मिळालेली माहिती आणि अन्य खबऱ्यांकडून मिळालेली माहिती यावरून पोलिसांनी छापा टाकून या दोन आरोपींना अटक केली. हत्या प्रकरण घडल्यापासून डॉ रायबसे त्यांच्या पत्नीसह त्यांच्या निवासस्थानापासून गायब होते. डॉ रायबसे हे वैद्यकीय व्यवसाय ऊसतोड कामगार पुरवठा, ट्रॅक्टर, जेसीबी भाड्याने देणे असे अनेक काही व्यवसाय करत होते. या व्यवसायाच्या अनुषंगाने आरोपी आणि त्यांचे व्यक्तिगत व व्यावसायिक संबंध होते. डॉ रायबसे यांच्या पत्नी वकील आहेत.
नेमकी हत्या घडली त्याच दिवसापासून रायबसे दांपत्य गायब झाले. त्यांचे मोबाईल देखील नॉट रिचेबल होते. त्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावर संशय वाढला. नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या शोधासाठी केरळ येथे पोलीस पथक पाठवण्यात आले. मात्र, ते सापडले नाहीत. अखेर अधिक चौकशी केली असता काल रात्री नांदेड येथे पोलिसांना ते सापडले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीचा आरोपींना पकडण्यासाठी उपयोग झाला असा उल्लेख बीड पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आला आहे.