संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का
वाल्मिक कराडचा अद्याप समावेश नाही
बीड: प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्व आठ आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणातील आरोपी असून त्याच्यावर अद्याप देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा दाखल नसल्याने त्याच्यावर अद्याप मोक्का लावण्यात आलेला नाही.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे केवळ बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. विविध ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. प्रामुख्याने कराड याच्यावर हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा आणि सर्व आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी सार्वत्रिक मागणी आहे. या पार्श्वभूमीवर सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, सुधीर घुले, प्रतिक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणे या आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपल्याला तपासाची माहिती मिळावी
आपल्या वडिलांच्या हत्येला महिना उलटून गेला असून पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र, त्याबाबत कोणतीही माहिती आम्हाला दिली जात नाही. ही माहिती आम्हा देशमुख कुटुंबीयांना आणि महाराष्ट्रातील जनतेला मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे तपासात होणाऱ्या प्रगतीची माहिती वेळोवेळी दिली जावी, अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांनी केली आहे.