राजीनाम्याचा विषय फिरून धनंजय मुंडे यांच्या कोर्टात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महत्त्वाचे विधान
मुंबई: प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच खुद्द मुंडे यांच्या कोर्टा टोलावला आहे. त्याचवेळी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायचा का, हा मुंडे यांचा प्रश्न आहे. त्यामुळे यासंबंधी त्यांच्याकडे चौकशी करा, असेही पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
विशेषतः देशमुख हत्या प्रकरणी मुंडे यांचा उजवा हत समजला जाणारा वाल्मीक कराड सहभागी असल्याचा आरोप होताच मुंडे यांच्या राजीनामाच्या मागणीने जोर धरला. केवळ विरोधक आणि अंजली दमानियांसारखे सामाजिक कार्यकर्तेच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील आमदारांकडूनही मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
या मागणीने जोर धरल्यानंतर याबाबत उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख या नात्याने अजित पवार यांच्याकडे मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल पत्रकारांनी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील, असे उत्तर दिले होते. मात्र, हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पक्षांतर्गत विषय असल्यामुळे त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पवार यांच्याकडेच आहे, असे फडणवीस यांनी सांगितले होते.
त्यानंतर आज पुन्हा पत्रकारांनी राजीनाम्याबद्दल विचारणा केली असता, पवार यांनी या प्रश्नाचा चेंडू थेट मुंडे यांच्याकडे टोलवला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे आपला काडीमात्र संबंध नसल्याचे स्पष्टीकरण मुंडे यांनी आपल्याकडे दिल्याचे पवार म्हणाले. त्याचवेळी मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्यांकडे त्यांच्या विरोधात काही पुरावे असतील तर ते विशेष तपास पथक आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करावे, असेही ते म्हणाले.
आपण तब्बल 34 वर्ष महत्त्वाच्या विभागांचे मंत्रीपद सांभाळत असताना अत्यंत काटेकोरपणे आणि संवेदनशील वृत्तीने कामकाज केले आहे. तरीही ज्यावेळी आपल्यावर आरोप झाल्यानंतर चौकशी पूर्ण होईपर्यंत आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र, नैतिक मुद्द्यावर राजीनामा देणे हा पूर्णपणे व्यक्तिगत विषय आहे, असे विधानही पवार यांनी केले.