अखेर धनंजय मुंडे यांनी दिला राजीनामा
मुंडे यांना पदमुक्त केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष मारहाण आणि हत्येची छायाचित्र प्रसिद्ध होताच राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. फडणवीस यांनी हा राजीनामा मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे रवाना केल्याचे सांगितले.
खंडणी प्रकरणातून संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी देशमुख यांना मारहाण आणि हत्या करताना त्याचे छायाचित्रण केले. ते समाजमाध्यमातून प्रसिद्ध झाले आणि केवळ बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर संतापाची लाट उसळली.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत मुंडे यांना मंत्रीपदावरून दूर करावे, अशी मागणी विरोधकांबरोबरच मुंडे यांच्या मित्र पक्षातील आणि स्वपक्षातील आमदार, खासदार, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकही सातत्याने करत होते. मात्र, आजपर्यंत त्यांच्या राजीनाम्याबाबत नेत्यांकडून टोलवाटोलवी केली जात होती.
मात्र, देशमुख हत्या प्रकरणाची छायाचित्र प्रसिद्ध होताच राज्यभर केवळ मुंडे यांच्यावरच नव्हे तर त्यांना पाठीशी घालणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधातही संतापाची लाट उसळली. या पार्श्वभूमीवर काल मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची बैठक झाल्याचे सांगण्यात येते. या बैठकीत मुंडे आपल्या भूमिकेवर ठाम राहून राजीनामा देण्यास नकार देत होते. आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, हा त्यांचा दावा कायम होता. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठामपणे मुंडे यांना आजच राजीनामा द्या, असे सुनावले.
त्यानंतर आज सकाळी 11 च्या सुमारास मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकाने मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नेऊन पोहोचविला. मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा स्वीकारला असल्याचे सांगितले. तसेच पुढील कामकाजासाठी तो राज्यपालांकडे रवाना केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Comment List