'धनंजय मुंडेंना सहआरोपी करा'

आमदार रोहित पवार यांची मागणी

'धनंजय मुंडेंना सहआरोपी करा'

मुंबई: प्रतिनिधी 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचा केवळ राजीनामा पुरेसा नाही. ज्या खंडणी प्रकरणातून देशमुख यांची हत्या झाली ती खंडणी मागण्याची बैठक धनंजय देशमुख यांच्या निवासस्थानी झाली, असा सत्ताधारी आमदारांचा आरोप आहे. त्याबद्दल मुंडे यांना याप्रकरणी सहआरोपी करावे आणि त्यांची कठोर चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. 

संतोष देशमुख मारहाण आणि हत्येची छायाचित्र प्रसिद्ध होताच राज्यभरात संतापाची लाट उसळली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला. वैद्यकीय कारणासाठी आपण राजीनामा देत असल्याचे मुंडे यांनी नमूद केले आहे. 

एका कंपनीकडून खंडणी मागण्याच्या प्रकरणात देशमुख यांची हत्या झाली आहे. ही खंडणी मगण्यासाठी जी बैठक धनंजय मुंडे यांच्या घरी झाली, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनीच केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून या प्रकरणाची कसून चौकशी केली जाणे आवश्यक आहे. देशमुख कुटुंबीय आणि राज्यातील जनतेची ही मागणी आहे, असे पवार यांनी सांगितले. 

मोठ्या संख्येने सत्ताधाऱ्यांचे आमदार निवडून आल्यामुळे विरोधकांनी, सर्वसामान्य जनतेने कितीही विरोध करू दे, कितीही आंदोलने करू दे, आपले कोणी वाकडे करू शकत नाही, अशी सत्ताधाऱ्यांची भावना झाली होती. मात्र, देशमुख कुटुंबीयांनी केलेला संघर्ष आणि जनतेने तीव्रपणे व्यक्त केलेल्या भावना यापुढे सरकारला झुकावे लागले. गुडघ्यावर यावे लागले, असेही पवार म्हणाले. 

... मग काय भजी तळत होतात का? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील पवार यांनी सडकून टीका केली. तुम्ही मुख्यमंत्री आहात. तुम्ही कोणालाही उभे करू शकता. मग इतके दिवस राजीनामा का नाही घेतला? मग काय भजी तळत बसला होतात का, असा संतप्त सवाल पवार यांनी केला. देशमुख यांच्या हत्येच्या  वेळी पोलीस जर नसते तर भाऊ वाचला असता, असे धनंजय देशमुख म्हणाले आहेत. म्हणजे या प्रकरणात पोलीसच सहभागी आहेत. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती, तर ही हत्या झाली नसती. यांच्या फोनच्या नोंदी तपासल्या तर काही हाती लागू शकेल. मात्र, राजकीय व्यक्तींच्या  उन्मत्त वर्तणुकीकडे दुर्लक्ष केले तर पायउतार व्हावे लागेल, असा इशाराही पवार यांनी सरकार आणि मुख्यमंत्र्यांना दिला. 

 

 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us