'...उत्तर प्रदेशात पाठवा, चांगले उपचार होतील'
अबू आझमी यांच्या विधानावर योगीही कडाडले
लखनौ: वृत्तसंस्था
क्रूरकर्मा औरंगजेब हा आदर्श मानणाऱ्या अबू आझमी यांना पक्षातून काढून टाका किंवा त्यांना उत्तर प्रदेशमध्ये पाठवा. आम्ही त्यांच्यावर चांगले उपचार करू, अशा शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाला सुनावले. समाजवादी पक्ष हा आता डॉ रामप्रसाद लोहिया यांच्या विचारावर चालत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
अमानुष छळ करून छत्रपती संभाजी महाराजांचा वध करणाऱ्या औरंगजेबाची आदर्श आणि नि:स्वार्थी शासक म्हणून भलामण करणाऱ्या अबू आझमी यांच्या विधानाचे पडसाद उत्तर प्रदेश विधानसभेतही उमटले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अबू आझमी यांच्या विधानावर चांगलेच कोरडे ओढले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी परंपरेचा अभिमान न बाळगता त्याचा अवमान करणारे आणि औरंगजेबाला आदर्श मानणारे अबू आझमी यांना या देशात राहण्याचा अधिकार आहे का, हे समाजवादी पक्षाने स्पष्ट करावे, असेही योगी म्हणाले.
एकीकडे तुम्ही महाकुंभवर टीका करता. दुसरीकडे औरंगजेबासारख्या देशभरातील मंदिरे उध्वस्त करणाऱ्या क्रूरकर्म्याचे गुणगान गाता. तुम्ही तुमच्या आमदारांच्या बडबडी वर नियंत्रण ठेवू शकत नाही का? त्यांच्या बेताल विधानाचा निषेध का करत नाही, असे सवाल योगी यांनी समाजवादी पक्षाला केले आहेत.
Comment List