नेपाळमधील पोखरा येथे संत संमेलनाचे आयोजन
पाच देशातील साधुसंत आणि विचारवंत राहणार उपस्थित
पुणे: प्रतिनिधी
नेपाळमधील पोखरा या ठिकाणी दिनांक 21 मार्च रोजी संतांचे संमेलन आयोजित करण्यात आले असून या संमेलनाला पाच देशातील साधुसंत उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आंतरराष्ट्रीय संत बौद्धिक मंच आणि नरेंद्र मोदी विचार मंचचे पुणे शहराध्यक्ष यमराज खरात आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विष्णू सकट यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय संत बौद्धिक मंचाचे नेपाळ अध्यक्ष आचार्य युवराज यांच्या नेतृत्वाखाली आणि मंचाचे आंतरराष्ट्रीय महामंत्री आचार्य शंकरगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन होणार आहे. मंचाचे संघटन महामंत्री श्री श्री 108 श्री बालका नंदगिरी महाराज हे या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मंचचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष स्वामी स्वदेशानंद महाराज (सूरज ब्रह्मे) संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
नरेंद्र मोदी विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष रवी चाणक्य, मध्य प्रदेशमध्ये कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा प्राप्त असलेले तेल घाणी बोर्डाचे अध्यक्ष किरण साहू, नरेंद्र मोदी विचार मंचचे संरक्षक हसमुख मोदी, महामंडलेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या या संमेलनात भारत, नेपाळ, इंडोनेशिया, भूतान आणि अमेरिका या देशातील साधुसंत आणि विचारवंत उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनाचा एक भाग म्हणून सनातन धर्म समर्पण समारोह आयोजित करण्यात आला आहे. सनातन धर्माला समर्पित असलेल्या साधुसंत आणि विचारवंतांना एका मंचावर आणून सनातन धर्माचा प्रचार प्रसार आणि संरक्षण, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याचा आग्रह, भारतात सनातन बोर्डाची स्थापना करणे, गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देणे अशा एकूण 11 मागण्या या संमेलनात केंद्र सरकारकडे केल्या जाणार आहेत, अशी माहिती खरात यांनी दिली.
या संमेलनात भारतातून 500 हून अधिक साधुसंत व विचारवंत भगवे वस्त्र धारण करून आणि भगवा ध्वज हाती घेऊन सहभागी होणार आहेत. संमेलनापूर्वी 2000 महिलांचा सहभाग असलेली कलश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत हत्ती, घोडे, रथ, बग्गी, नेपाळी भाषा यांचा समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे लाठी, काठी, तलवारबाजी या मर्दानी खेळांचा समावेशही या यात्रेत असणार आहे रथामध्ये प्रमुख अतिथिंसह महामंडलेश्वर विराजमान असणार आहेत. संमेलनाच्या ठिकाणी प्रमुख अतिथिंचे स्वागत झाल्यानंतर व्याख्याने होणार आहेत, अशी माहिती विष्णू सकट यांनी दिली.
Comment List