ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उध्वस्त
पिक्चर अभी बाकी है?
नवी दिल्ली : प्रतिनिधी
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कट जिथे रचला गेला त्या ठिकाणासह पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ अड्डे भारतीय संरक्षण दलांनी नष्ट केले आहेत. भारताच्या या भूमिकेला जगभरातून पाठिंबा व्यक्त होत आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत जोरदार प्रत्युत्तर देईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार दिली होती. देशभरातून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली जात होती. मात्र, हल्ला होऊन १४ दिवस उलटल्यानंतरही कोणतीही कारवाई होत नसल्याबद्दल काही प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र, भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. भारताच्या या हल्ल्यांवर पाकिस्तान काय प्रतिक्रिया देणार? भारत आणि पाकिस्तान या देशांमधील युद्धाला या हल्ल्यांमुळे तोंड फुटणार का, याबद्दल जगभरात उत्कंठा आहे.
हे हल्ले हे पाकिस्तानच्या विरोधात लढाई नाही तर पाकिस्तानात बसून भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाई आहे, असे भारताने स्पष्ट केले आहे. आम्ही पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी तळाला लक्ष्य केले नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही कारवाई अपेक्षित असल्याचे नमूद केले आहे. पाकिस्तानने या कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करू नये, असा गर्भित इशारा अमेरिकेने दिला आहे. इस्राएलने या हल्ल्यांचे समर्थन केले आहे. केवळ अझरबैजनने या हल्ल्याचा निषेध केला आहे.