'... म्हणून पंकजाताईंना सांगितले मस्साजोगला नका येऊ'
धस यांच्या पंकजा मुंडे यांच्यावरील आरोपावर धनंजय देशमुख यांचे स्पष्टीकरण
बीड: प्रतिनिधी
संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पंकजा मुंडे या आमचे सांत्वन करण्यासाठी मस्साजोगला येणार होत्या. मात्र, क्या आल्या असल्या तर गावात कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता होती. त्यामुळे आपणच त्यांना न येण्याची विनंती केली, असे स्पष्टीकरण संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिले आहे.
धनंजय मुंडे यांच्यानंतर आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. संतोष देशमुख हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते. खुद्द पंकजा मुंडे यांचे बूथ प्रमुख होते. तरी दखील पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्याची तसदी घेतली नाही, अशी टीका केली आहे.
यावर पंकजा मुंडे यांनी केलेल्या स्पष्टीकरणाला धनंजय देशमुख यांनी दुजोरा दिला आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आपण देशमुख कुटुंबाला भेटण्यासाठी मस्साजोग येथे निघालो होतो. वाटेत असतानाच आपल्या कार्यकर्त्यांनी धनंजय देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीच गावात गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त करून न येण्याची विनंती केली. त्यामुळे आपण फोनवरूनच देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन केले, असा खुलासा पंकजा मुंडे यांनी केला आहे.
धनंजय देशमुख यांनी देखील पत्रकारांशी बोलताना आपणच मुंडे यांना येऊ नका, असे सांगितल्याचे स्पष्ट केले. ज्या वेळी पंकजा मुंडे या मस्साजोगला येण्यासाठी निघाल्या होत्या त्यावेळी गावात आरोपींच्या समर्थकांचा वावर होता. ते आमच्यावर नजर ठेवून होते. त्यांची आजही आमच्यावर नजर आहे. त्यावेळी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी मुंडे यांच्या गाडीवर दगडफेक केली असती किंवा त्यांच्याशी गैरवर्तन केले असते तर कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असती. त्याची जबाबदारी आमच्यावर आली असती असती. त्यामुळे आपणच त्यांना न येण्याची विनंती केली, असे धनंजय देशमुख यांनी सांगितले आहे.
Comment List