'... ही अभिव्यक्ती नव्हे तर सुपारी घेऊन केलेला स्वैराचार'
कुणाल कामरा याच्या गाण्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
मुंबई: प्रतिनिधी
कुणाल कामरा याने केलेले गाणे ही कलेची अभिव्यक्ती नाही तर कोणाकडून तरी सुपारी घेऊन केलेला स्वैराचार आहे. व्यभिचार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणाल कामरा याच्या वादग्रस्त गाण्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कुणाल कामरा याने एका कार्यक्रमात शिवसेना फुटीच्या पार्श्वभूमीवर एक विडंबनात्मक गाणे सादर केले होते. या गाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करण्यात आले असून त्यामुळे त्यांचा अपमान झाल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी कुणाल यांनी गाणे ज्या ठिकाणी गायले त्या हॉटेलमधील स्टुडिओची मोडतोड केली आहे. या प्रकारामुळे राज्यभर खळबळ माजली आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलेच पाहिजे. मात्र, कुणाल चे गाणे ही कलेची अभिव्यक्ती नाही. कोणाकडून तरी सुपारी घेऊन त्याने हा प्रकार केला आहे. यापूर्वी अनेकांनी टीका केली अनेकांनी विडंबन केले. त्याबद्दल आपण प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. आरोप आणि टीकेला कामातून उत्तर देणे ही आपली पद्धत आहे, असेही शिंदे म्हणाले.
कुणालने आपल्यावर टीका करणारे गाणे हॉटेलमधील ज्या स्टुडिओत गायले त्या स्टुडिओची शिवसैनिकांनी तोडफोड केली. आपण निश्चितपणे या प्रकाराचे समर्थन करीत नाही. मात्र, कुणालच्या कृतीवर शिवसैनिकांनी व्यक्त केलेली ती संतप्त प्रतिक्रिया होती, असेही शिंदे यांनी नमूद केले.