'विजेवरील वाहने करमुक्त करणार'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील विजेवर चालणाऱ्या सर्व वाहनांना करमुक्त करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. त्याचप्रमाणे सर्व मंत्र्यांची व शासकीय कार्यालयातील वाहने विजेवर चालणारी असतील, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विचारलेल्या पर्यावरण संबंधी प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
सध्या तीस लाखापर्यंत किंमत असलेल्या विद्युत वाहनांवर सहा टक्के कर आकारणी केली जात आहे. आता सरसकट सर्व विद्युत वाहनांना करमुक्त केले जाणार आहे. त्याचप्रमाणे सर्व शासकीय वाहने विजेवर चालणारी असतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शासकीय योजना गरजूंसाठी. लोभी लोकांसाठी नाही
आमदारांना वाहनांसाठी दिले जाणारे कर्ज केवळ विद्युत वाहनांसाठीच दिले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. त्यावर ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी आपल्याला मर्सिडीज घ्यायची आहे, अशी टिप्पणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी, शासकीय योजना गरजू लोकांसाठी असतात लोभी लोकांसाठी नाही, अशा शब्दात टोला लगावला.
आम्हाला रस्त्यावर आणायचेच असेल तर...
यापूर्वीचे मुख्यमंत्री रस्ते धुवायला जायचे. विद्यमान मुख्यमंत्री ही तसे करणार का, असा खोचक सवाल यावेळी अनिल परब यांनी केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, परब यांनी मला रस्त्यावर आणायचे ठरवलेच असेल तर माझी ही त्याला पूर्ण तयारी आहे. मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावर सभागृहात एकच हशा पिकला.
पुणे आणि छत्रपती संभाजीनगर बनत आहेत ईव्ही कॅपिटल
पुणे आणि संभाजीनगर येथे विद्युत वाहनांचे अनेक मोठे प्रकल्प आहेत. ही शहरे आता विद्युत वाहनांची राजधानी बनत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी अडीच हजार विजेवर चालणाऱ्या बसेस खरेदी करण्याचा सरकारचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. मेट्रोचे जाळे आणि विद्युत बसेस याच्या आधारे शहरातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढला जाईल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.