मुंबई पुण्यासह कोकण किनारपट्टीवर 'हाय अलर्ट'
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क
मुंबई: प्रतिनिधी
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई, सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे या शहरांसह कोकण किनारपट्टीवर 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला असून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासह अनेक पर्यटन स्थळांवर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोकणच्या रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीच्या भागांवरही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. किनारपट्टीकडे जाणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी व प्रवाशांची चौकशी करण्यात येत आहे.
गर्दीची ठिकाणे, महत्त्वाच्या इमारती व संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि परिमंडळाचे उपायुक्त यांना अधिक सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी देखील संशयास्पद व्यक्ती, हालचाली अथवा वस्तू निदर्शनास आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.