'भारताने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावे'
ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य मेघनाद देसाई यांचा सल्ला
लंडन: प्रतिनिधी
भारताला काश्मीरचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर त्याने सरळ पाकव्याप्त काश्मीरचा ताबा घ्यावा, असा सल्ला ब्रिटन संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ लॉर्ड मेघनाद देसाई यांनी दिला आहे. काश्मीरचे तत्कालीन महाराजा हरीसिंग यांनी विलिनीकरणाचे पत्र भारताला दिलेल्या असल्यामुळे त्यांचा दावा वैध आहे, असेही ते म्हणाले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याचा भारताचा निर्धार आहे. जगभरातून पाकिस्तानचा निषेध होत आहे. ब्रिटनचे आणखी एक खासदार बॉब ब्लॅकमन यांनी या प्रकरणी भारताला यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे.
काश्मीर प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडून त्यादृष्टीने प्रयत्न केले जातील, असा विश्वास व्यक्त करतानाच लॉर्ड देसाई यांनी काश्मीरचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी भारताने पाकव्याप्त काश्मीर भारतात समाविष्ट करून घ्यावे, असा सल्ला दिला.
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला धक्कादायक आहे. दहशतवाद्यांनी क्रौर्याचा कळस गाठल्याचे या घटनेतून दिसून आले आहे. दहशतवादाचा बीमोड करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही लॉर्ड देसाई म्हणाले.