शुभमन गिलच्या गळ्यात पडणार कसोटी कर्णधार पदाची माला
रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या निर्णयाने खळबळ
मुंबई: प्रतिनिधी
भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे क्रिकेटच्या चाहत्यांबरोबरच खेळाडूंमध्येही खळबळ माजली आहे. या निर्णयामुळे संघाच्या कर्णधारपदाची माला शुभमन गिल या युवा खेळाडूच्या गळ्यात पडणार असल्याचे सांगितले जात आहे. शुभमन सध्या कसोटी संघाचा उपकर्णधार आहे.
रोहित याने काल रात्री समाजमाध्यमावरून कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. एक दिवसीय क्रिकेट आपण खेळत राहणार असल्याची ग्वाही देखील रोहितने दिली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देखील समाजमाध्यमाद्वारे या निर्णयाला संमती दिली. मागील काही काळापासून रोहितची कसोटी क्रिकेट मधील कर्णधार पदाची जबाबदारी कमी करून ती युवा खेळाडूवर सोपवण्याचा नियम मंडळाचा विचार असल्याची चर्चा होती. त्यामुळेच त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.
रोहित याच्या निवृत्तीमुळे कर्णधार पदाच्या स्पर्धेत शुभमन याचे नाव आघाडीवर आहे. लवकरच भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या सर्व सामन्यांसाठी भारताचा हुकमी जलद गती गोलंदाज जसप्रीत बुमराह उपलब्ध असण्याची शक्यता नसल्यामुळे शुभमन याच्यावरच कर्णधार पदाची जबाबदारी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली निवड समितीकडून सोपविण्यात येईल, अशी सर्वाधिक शक्यता आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये शुभमन सध्या गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करत आहे. आयपीएल क्रिकेट 2025 मध्ये हा संघ गुणतालिकेत आघाडीवर आहे.