मराठा आंदोलनकर्त्यांच्या सोयीसुविधांसाठी प्रभाकर देशमुखांचा पुढाकार
मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची घेतली भेट
पुणे: प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली.
मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालयांची व्यवस्था, आरोग्य सेवा आणि इतर अत्यावश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी यावेळी देशमुख यांनी केली. आंदोलनाचा व्याप वाढत असल्याने मोठ्या संख्येने नागरिक मुंबईत दाखल होत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्य, सुरक्षा आणि सार्वजनिक सोयी यांचा प्रश्न गंभीर होत असल्याचे देशमुख यांनी अधोरेखित केले.
या पार्श्वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीत आंदोलकांची सद्यस्थिती, त्यांची गरज तसेच मोर्चादरम्यान उद्भवू शकणाऱ्या अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तातडीने उपाययोजना राबवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.
बैठकीत विकास पासलकर,ॲड.आशिषराजे गायकवाड,ॲड. डुबे पाटील,ॲड. टेकाळे, सौरभ मोरे यांच्यासह इतर मराठा समन्वयक उपस्थित होते. आंदोलकांना आवश्यक सुविधा पुरविल्या गेल्यास आंदोलन शांततेत आणि संयमाने पार पडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.