'जरांगे नावाचे भूत उभे केले पवारांनीच'
लक्ष्मण हाके करणार बारामतीत आंदोलन
मुंबई: प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील नावाचे भूत राष्ट्रवादी काँग्रेस शहर चंद्र पवार यांचे प्रमुख शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उभे केल्याचा आरोप करून लाखो इतर मागासवर्गीय समाज प्रा. लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली बारामतीत आंदोलन करणार असल्याची माहिती ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनातील सूत्रांनी दिली.
एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जाऊ नये यासाठी नागपूरसह विविध ठिकाणी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनांतर्गत साखळी उपोषण सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन पवारांनी पुरस्कृत केले असल्याचा आरोप केला आहे. एकीकडे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला रसद पुरवायची आणि दुसरीकडे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, अशी मागणी करत मंडल यात्रा काढायची, असे पवार यांचे दुटप्पी धोरण असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.
पवार यांनी मतांची बेगमी करण्यासाठी ओबीसी आणि मराठा समाजाला एकमेकांसमोर उभे केल्याचा आरोप भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. ज्या मराठा आंदोलनाला पवार यांनी हवा दिल्याचा आरोप होत आहे, त्याच शरद पवार यांच्या कन्या जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आंदोलनस्थळी गेल्या असताना काही आंदोलकांनी त्यांना घेराव घातला. शरद पवार यांनी समाजाचे वाटोळे केल्याचा आरोप करीत आंदोलकांनी सुळे यांच्या गाडीवर बाटल्याही फेकल्या.