न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई घेत आहे मोकळा श्वास
हुतात्मा चौकासह दक्षिण मुंबईतील अनेक ठिकाणे रिकामी
मुंबई: प्रतिनिधी
गुणवंत सदावर्ते यांच्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मराठा आरक्षण आंदोलक आझाद मैदानावर एकवटले असून हुतात्मा चौक, मरीन ड्राईव्ह याच्यासह दक्षिण मुंबईतील अनेक ठिकाणांवर आंदोलकांचा वावर कमी झाला आहे. आंदोलकांनी रस्त्यावर लावलेली वाहने जवळच्या वाहन तळांवर अथवा थेट नवी मुंबईत हलवली आहेत. त्यामुळे मुंबईने पुन्हा मोकळा श्वास घेतला आहे.
मराठा आरक्षण आंदोलनामुळे मुंबई ठप्प झाली असून याप्रकरणी न्यायालयाने हस्तक्षेप करावा म्हणून ॲड गुणवंत सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने आंदोलकांना आझाद मैदानाशिवाय इतरत्र वावरण्यास मनाई केली आहे. त्याचप्रमाणे रस्ते मोकळे करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. आंदोलन स्थळी 5 हजारपेक्षा अधिक आंदोलन नसावे, या अटीचे पालन करण्याचे आदेश आंदोलनकर्त्यांना देण्यात आले आहेत. या याचिकेवरील सुनावणी आज पुन्हा पार पडणार आहे.
आज दुपारपर्यंत आंदोलकांमुळे झालेली गर्दी रिकामी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आंदोलकांनी रस्त्यावर लावलेली आपली वाहने काढली आहेत. पोलिसांकडूनही आवश्यक ती कारवाई केली जात आहे. पोलिसांनी आंदोलन करताना नोटीस बजावून आंदोलनाला परवानगी देताना गाळण्यात आलेल्या अटी शर्तींचे पालन करण्याची आठवण करून दिली आहे.
सरकारकडून दबाव तंत्राचा वापर
दरम्यान, सरकार दबाव तंत्राचा वापर करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे समन्वयक आणि जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीचे सदस्य चंद्रकांत भराट यांनी केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आंदोलकांनी आपली वाहने रस्त्यावरून काढून वाहन तळावर अथवा नवी मुंबईत हलवली आहेत. आंदोलन अटी आणि शर्तीचे पालन करून सहकार्य करण्यास तयार आहेत. मात्र, पोलिसांकडून विविध मार्गाने आंदोलकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्हाला आझाद मैदान खाली करण्यास सांगितले जात आहे. वास्तविक हे जन आंदोलन आहे. इथे गर्दी होणारच. दडपशाहीन हे आंदोलन दडपले जाणार नाही, असा दावा भराट यांनी केला.