पुणे : यशदा, पुणे येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांची महाराष्ट्र शासनाने प्रतिनियुक्तीने डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक या पदावर नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे संस्थेतील विस्तार व सेवा या पदाच्या विभाग प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे. या विभागामार्फत संस्थेची प्रकाशने, प्रचार -प्रसिद्धी त्याचबरोबर समतादूत प्रकल्प असे कामकाज त्यांच्याकडे सोपविण्यात आले.
त्यांनीनुकताच बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, डॉ बबन जोगदंड यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. महासंचालक यांच्या हस्ते डॉ जोगदंड यांना "महामानव " हा ग्रंथ तसेच पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत केले.
मा. महासंचालक यांनी याप्रसंगी बोलताना डॉ बबन जोगदंड यांनी देशातील नामवंत अशा 'यशदा' संस्थेमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले असुन ते उच्चशिक्षित दोन पीएचडी धारक आहेत. त्यांचा उच्चपदस्थ अधिकारी व तळागाळातील जनतेपर्यंत व्यापक जनसंपर्क असून पत्रकार म्हणूनही काही वर्ष त्यांनी काम केले आहे. बार्टी संस्थेच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते महत्वपूर्ण काम करतील, असा आशावाद व्यक्त करुन त्यांचे बार्टीत स्वागत केले.
याप्रसंगी निबंधक इंदिरा अस्वार, स्नेहल भोसले, वॄषाली शिंदे, यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. बबन जोगदंड यांनी पत्रकारिता व लोकप्रशासन या विषयात पीएचडी केली असून त्यांनी आतापर्यंत पंधरा विषयात पदव्या व १० विषयात प्रमाणपत्र, डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. ते यशदाच्या 'यशमंथन, या मासिकाचे संपादकही होते. त्यांनी अनेक पुस्तकांचे संपादन,लेखन केले आहे. त्याचबरोबर ते चांगले वक्ते, लेखक, अभ्यासक व सूत्रसंचालक आहेत. शासनाचे डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य व बालभारतीचे सदस्यही आहेत. विद्यापीठाच्या अनेक अभ्यासक्रम मंडळावरही त्यांनी काम केले आहे. सूत्रसंचलन रामदास लोखंडे यांनी केले तर आभार सुमेध थोरात यांनी मानले.
000