- राज्य
- '... आणि जनता घरी बसणाऱ्यांना घरी बसवणार'
'... आणि जनता घरी बसणाऱ्यांना घरी बसवणार'
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कल्याण डोंबिवली ठाकरे गटाला पाडाले खिंडार
कल्याण: प्रतिनिधी
काम करणाऱ्यांना पुढे पाठवणार आणि घरी बसणाऱ्यांना घरी बसवणार, हे आता जनतेने ठरवले आहे. बेस्ट पतपेढीची निवडणूक मतपत्रिकेवर झाली. आता त्याबद्दल काय बोलणार? यांनी निवडणूक जिंकली तर मतदान यंत्र चांगले. निवडणूक हरली तर मतदान यंत्र वाईट. हे यापुढे चालणार नाही. आता जनतेने महायुतीला कौल दिला आहे. या पुढच्या निवडणुकीतही जनता आमच्या पाठीशी राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
कल्याण डोंबिवली येथील शिवसेना ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी, सरपंच यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
आता आलेले सर्वजण पुन्हा स्वगृही आले आहेत. ते जिथे होते तिथे त्यांना चैन पडत नव्हते आणि त्यांच्या शिवाय आम्हाला चैन पडत नव्हते. हे सर्व पदाधिकारी म्हणून काम करत असले तरी आमचे एक कुटुंब आहे. हे सर्वजण श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात काम करणारे आहेत. मी त्यांचे मनापासून स्वागत करतो, असे शिंदे म्हणाले.
विकासाला प्राधान्य देणे, सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारणे, शासकीय योजनांच्या माध्यमातून तळागाळातील जनतेच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे, हेच महायुतीचे धोरण आहे. कल्याणकारी राज्य प्रभावीपणे चालविणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे. पक्षात आलेले पदाधिकारी मोठ्या विश्वासाने आले आहेत. त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. त्यांच्या भागाच्या विकासासाठी, समस्यांच्या निवारणासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.