- राज्य
- '... तर कितीही जण एकत्र आले तरी भोपळे मिळणार'
'... तर कितीही जण एकत्र आले तरी भोपळे मिळणार'
शशांक राव यांचा राज व उद्धव ठाकरे यांना टोला
मुंबई: प्रतिनिधी
कोणी कितीही जण एकत्र आले पण त्यांनी कामगारांचे, जनतेचे हित विचारात घेतले नाही तर त्यांना असेच भोपळे मिळत राहणार, अशा शब्दात बेस्ट कामगार सहकारी पतसंस्थेची निवडणूक जिंकणाऱ्या कामगार संघटनेचे नेते शशांक राव यांनी ही निवडणूक एकत्रित लढवणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना टोला लगावला.
ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे प्रतिष्ठेची बनलेल्या या निवडणुकीत या युतीला भोपळाही फोडता आला नाही. राव यांच्या संघटनेच्या पॅनलने 14 जागा जिंकल्या तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलने सात जागा जिंकल्या. या निवडणुकीत सहकार्य करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आशिष शेलार यांचे त्यांनी आभार मानले.
आपली कामगार संघटना सन 1946 सालापासून कार्यरत आहे. या संघटनेचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. मात्र, आपण स्वतः भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी सहमत असल्यामुळे त्या पक्षाशी संबंधित आहोत, असे राव यांनी स्पष्ट केले. कामगारांचे हित साधण्यासाठी कामगार संघटना राजकीय पक्षांचे सहकार्य घेतात. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस आणि शेलार यांच्याकडून आपल्याला नेहमी सहकार्य लाभते, असेही ते म्हणाले.
या निवडणुकीत भाजपकडून पैशाचा वापर केल्याचा आरोप बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केला आहे. त्याचाही समाचार राव यांनी घेतला. सामंत हे दीर्घकाळ बेस्ट पतपेढी आणि समितीतही होते. या काळात निवृत्त कर्मचाऱ्यांनी तीन तीन वर्ष ग्रॅच्युइटीची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्याचा अधिकार नाही, असे राव म्हणाले.
बेस्टकडे स्वमालकीच्या 3 हजार 300 गाड्या असणे नियमाप्रमाणे आवश्यक असतानाही प्रत्यक्षात अडीचशे गाड्यात शिल्लक राहिल्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, शिवसेनेकडे महापालिका आणि बेस्ट समिती असून देखील बेस्टसाठी नवीन गाड्यांची खरेदी करण्याऐवजी उद्धव ठाकरे कंत्राटदारांची तुंबडी भरत राहिले, अशी टीकाही राव यांनी केली.