सिडने पॉईंटवरील पालिकेचा सोलर ट्री कोसळला
नशीब बलवंतर पर्यटक नव्हते : निकृष्ट कामाचा नमुना चव्हाट्यावर
वाई : पांचगणी नगरपालिकेने सिडने पॉईंटवर सहा महिन्यापूर्वी उभारलेला अत्याधुनिक 'सोलर ट्री' काल तुफान वाऱ्याने जमीन दोस्त झाला. नशीब बलवंतर म्हणून हा सोलर ट्री पर्यटक नसताना कोसळला. त्यामुळे या घटनेत कसलीही मनुष्यहानी झाली नाही. यासाठी खर्च झालेले लाखो रुपये ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे पाण्यात गेल्याने पाचगणीकर नागरिक संतप्त झाले आहेत.
या घटनेने पांचगणी नगरपालिकेच्या निकृष्ट विकासकामांचा भोंगळ कारभार आज चव्हाट्यावर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की पांचगणी नगरपालिका आपले हद्दीतील सर्व पर्यटन पॉईंट सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च करीत असते. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सर्व पॉईंटवर पर्यटकांच्या आकर्षणासाठी खेळणी बसवणे, पॅगोडा, झुलते पूल, गॅलरी अशा विविध कामांसाठी खर्च करीत आहे. परंतु या कामांना निकृष्टेचा वास नेहमी पहायला मिळत आहे. आज झालेल्या घटनेतील सोलर पॅनल ट्री ही याचा कामाचा नमुना आहे. सहा महिन्यापूर्वी सिडने पॉईंट व टेबल लँडवर एक असे दोन सोलर ट्री बसवले. हे काम ज्या ठेकेदाराने केले आहे. ते पूर्णपणे निकृष्ट केले असल्याचे निदर्शनास येत आहे.
हे काम नेहमी जोरदार वारे असणाऱ्या पॉईंट वर बसवले आहेत त्यामुळे त्याचे फाउंडेशन दर्जेदार होणे गरजेचे होते परंतु ते खोलवर व चांगल्या प्रतीचे नसल्याने हा ट्री पहिल्याच पावसाळ्यापूर्वी कोसळला. यावठिकाणी सर्व सोलर पॅनलचे नुकसान झाले असून या ठिकाणी सर्व काचांचा ढीग पडला आहे. यात वापरलेले साहित्य ही चांगल्या प्रतीचे नसल्याने हा ट्री कोसळला असल्याचे सांगण्यात येत आहे.
सहा महिन्यात हे काम कोसळल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अशी कामे करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पांचगणी नगरपालिकेने सिडने पॉईंट येथे लाखो रुपये खर्च करून डिझाईन मध्ये ,सॉलर युनिट बसवले होते. त्या युनिट मध्ये थोडे आर्थिक वजन कमी पडल्यामुळे ते वाऱ्याच्या झोक्याने ते युनिट जमिनीवर कोसळले. नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्ची टाकायचे पण ठेकेदाराने आपल्या जास्तीत जास्त आर्थिक फायद्यासाठी निकृष्ट दर्जाची कामे करायची. या ठेकेदारावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. - दिपक कांबळे, सामाजिक कार्यकर्ते
सिडने पॉईंट हा उंचावर असून या ठिकाणी वाऱ्याचे मोठे प्रमाण असते. सध्या पाऊस सुरू असून या ठिकाणी जोराचे वारे वाहत आहे. या वाऱ्याने हे युनिट कोसळले आहे. तरीसुध्दा आम्ही संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करणार आहोत. - मुख्याधिकारी निखिल जाधव.
0000000000000